भास्कर जाधवांवर कोकण नागरी संघर्ष समितीचा गंभीर आरोप
खेड | प्रतिनिधी
काल विधानसभेत चिपळूण–गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात यावे अशी मागणी केली. मात्र या मागणीवरून कोकण नागरी संघर्ष समितीचे अशोकराव जाधव यांनी तीव्र आणि गंभीर आरोप करत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यापेक्षा कोकणात कॅन्सरचे रुग्णच तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, मात्र आमदार भास्कर जाधव यांची भूमिका याच्या नेमकी उलट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अशोकराव जाधव यांनी सांगितले की, काल विधानसभेत पिफासच्या उत्पादनासंदर्भात जवळपास वीस आमदारांनी आवाज उठवला होता. या चर्चेत रत्नागिरी जिल्ह्यातून केवळ आमदार शेखर निकम यांनी ठाम भूमिका घेत संबंधित कंपनी बंद करण्याची मागणी केली. मात्र गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या या कंपनीविरोधात एक शब्दही न बोलता थेट कॅन्सर हॉस्पिटल कोकणात व्हावी अशी मागणी केली. जर त्यांनी कॅन्सर निर्माण करणाऱ्या कंपनीविरोधात आवाज उठवला असता तर कोकणी जनतेला त्यांचा अभिमान वाटला असता, असे परखड मत अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.
कॅन्सर हॉस्पिटल तयार करणे आणि कॅन्सरचे रुग्ण तयार करणे यामध्ये कुठेतरी संबंध जोडण्याचा प्रयत्न भास्कर जाधव करत आहेत का, असा सवाल उपस्थित करत जर तसेच असेल तर भास्कर ‘शेठ’ जाधव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणीही त्यांनी केली.
गेल्या ३८ दिवसांपासून लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाहेर कोकण नागरी संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला स्थानिक आमदार म्हणून भास्कर जाधव यांनी प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. केवळ फोन करून चौकशी करत कंपनी प्रशासन आणि सचिवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही हालचाल झालेली दिसून येत नाही. त्यामुळे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला भास्कर जाधव यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे आमचे मत बनले आहे, असेही अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
या धरणे आंदोलनाला कोकणातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.











