​सावंतवाडीत उद्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा

ग्रंथदिंडी आणि बाल साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार असून, ग्रंथदिंडी आणि बाल साहित्य प्रदर्शन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.

​कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत मराठी भाषेची समृद्धी आणि कुसुमाग्रजांच्या योगदानाचा जागर केला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजता ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बाल साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल.

​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी समीर घारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके असतील. तसेच ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​यावेळी शालेय विद्यार्थ्यांची विविध सादरीकरणे होणार असून, मराठी भाषेचा गौरव केला जाईल. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.