सावंतवाडीतील एका धार्मिक शैक्षणिक संस्थेत दोन बालकांना अमानुष मारहाण

सीसीटीव्ही फुटेजमुळे मौलानाचा प्रताप उघड

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
शहरातील बाहेरचावाडा परिसरातील एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत दोन १२ वर्षीय बालकांना अमानुषपणे मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित शिक्षक (मौलाना) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

​ ​सावंतवाडी येथील एका धार्मिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन लहान मुलांवर किरकोळ कारणावरून रागावून, तेथील शिक्षक आलमगीर अल्लाउद्दीन शेख (वय ६४, रा. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याने त्यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्यांचेही हृदय पिळवटून गेले. व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

​ या ​घटनेचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ संबंधित संस्थेत धाव घेतली आणि घटनेची पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी संशयित आरोपी आलमगीर शेख याला ताब्यात घेतले आहे.

​ या प्रकरणी संशयित ​आरोपीवर बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण २०१५ ) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ​लहान मुलांवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी कडक कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

​ ​या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करत आहेत. शैक्षणिक किंवा धार्मिक संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशा प्रकारे मुलांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तीचा पोलीस प्रशासनाने कडक शब्दांत निषेध केला असून, पालकांनीही सजग राहण्याचे आवाहन केले आहे.