अण्णा कदमांनी जपली मैत्री; राजकारणापेक्षा नात्यांना दिले प्राधान्य

खेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांनी मैत्रीचा वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. निवडणुकीच्या यशानंतर एका जिवलग मित्राने फोनवरून अभिनंदन करताच, “अभिनंदन स्वीकारायला नव्हे, तर मित्राच्या भेटीस येतोय,” असे सांगत प्रत्यक्ष भेटीचा आग्रह केला. त्यावर अण्णा कदम यांनी, “तू येऊ नकोस, मीच तुला भेटायला येतो,” असे स्पष्ट करत दिलेले आश्वासन त्यांनी गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात उतरवले.
राजकारणात सक्रिय असतानाही मैत्री आणि मित्रत्व जपण्याला अण्णा कदम यांनी नेहमीच अग्रक्रम दिला आहे. निवडणुकीपुरते राजकारण आणि उर्वरित काळात समाजकारण, अशी त्यांची ओळख आहे. या भेटीतून त्यांनी राजकारणापेक्षा मैत्री श्रेष्ठ असल्याचा संदेश देत, मित्र हेच माणसाची खरी ताकद असतात, हे कृतीतून दाखवून दिले.
या प्रसंगी अण्णा कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मैत्रीतील जिव्हाळा उलगडून दाखवला. खेडमध्ये प्रथम आल्यानंतरचा पहिला मित्र म्हणून उत्तमकुमार जैन यांचा उल्लेख करत, ते एक हुशार सामाजिक कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. आजही कोणतीही माहिती हवी असल्यास आपण त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना मदतीची गरज असल्यास आपण पुढे येतो, ही मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचे अण्णा कदम यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी सुकवली जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य सचिन धाडवे तसेच भरणे पंचायत समिती गटाचे सदस्य प्रशांत चव्हाण उपस्थित होते. चिराग मार्बलचे मालक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उत्तमकुमार जैन यांनी अण्णा कदम यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आश्वासन पाळणे, मैत्री जपणे आणि राजकारणापलीकडे माणुसकी जपण्याचा संदेश देणारी ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. अण्णा कदम यांनी घालून दिलेला हा आदर्श नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.