घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘स्पार्कऑन’ टेक-मॅनेजमेंट फेस्टचा दणदणीत उत्साह

खेड (प्रतिनिधी) – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि सर्जनशील कौशल्यांना व्यासपीठ देणाऱ्या ‘स्पार्कऑन – टेक-मॅनेजमेंट फेस्ट’ या आंतरमहाविद्यालयीन उपक्रमाचे यशस्वी आयोजन ११ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. महाविद्यालयाच्या एम.एम.एस. आणि एम.सी.ए. विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या फेस्टचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारे असे उपक्रम काळाची गरज असल्याचे नमूद केले. ‘स्पार्कऑन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धात्मक वातावरणच नाही, तर प्रत्यक्ष अनुभव, आत्मविश्वास आणि नव्या संधींची ओळख मिळते, असे त्यांनी सांगितले.

या टेक-मॅनेजमेंट फेस्टमध्ये बिझनेस प्लॅन स्पर्धा, प्रोजेक्ट स्पर्धा, रील मेकिंग, फोटोग्राफी, ऍड मॅड शो, लोगो डिझाइन, पोस्टर डिझाइन तसेच बी.जी.एम.आय. (BGMI) यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम साधणाऱ्या या स्पर्धांमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नेटवर्किंगची संधी मिळून वर्गाबाहेरील व्यावहारिक अनुभव प्राप्त होतो, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम.एम.एस. विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रथमेश तांबे, एम.सी.ए. विभागप्रमुख डॉ. पूनम शिट्याळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. मंगेश ठसाळे, प्रा. श्रृंगी तेली तसेच सर्व प्राध्यापक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘स्पार्कऑन’ फेस्टमुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे विद्यार्थ्यांच्या नवकल्पना आणि कौशल्यविकासासाठी एक प्रभावी केंद्र म्हणून अधिक दृढपणे अधोरेखित झाले आहे.