खेड गटविकास अधिकारी निवासस्थान अखेर जमीनदोस्त

वादळी पावसात मोठ्या प्रमाणात झाली होती पडझड, मोकळ्या जागेचे काय करणार?
खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील समर्थनगर येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे वादळी पावसात पडझड झालेले निवासस्थान अखेर  जमीनदोस्त करण्यात आले.आहे मोकळ्या झालेल्या परिसरात नेमके काय करणार हे गुलदस्त्यात आहे.
समर्थनगर येथील गटविकास अधिकाऱ्यांसाठीच्या निवासस्थान इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे निवासस्थानात गटविकास अधिकारी वास्तव्य न करता भाड्याच्या  खोल्यांमध्येच वास्तव्य करणे पसंत करत होते. त्यातच गतवर्षी झालेल्या वादळी पावसात गटविकास
अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर लगतचे महाकाय वृक्ष कोसळल्याने निवासस्थान उद्ध्वस्त झाले होते. ३ महाकाय वृक्ष कोसळल्याने निवासस्थानाची पुरती पडझड होवून मोठी हानी देखील झाली होती. अखेर येथील पंचायत समितीला पडझड झालेले गटविकास अधिकाऱ्यांचे निवासस्थान जमीनदोस्त करण्यासाठी  मुहूर्त मिळाला. संपूर्ण निवासस्थान पाडून परिसर मोकळा करण्यात आला आहे. याठिकाणी नवे निवासस्थान उभारणार की आणखी काही करणार, हे समजू शकले नाही.