रत्नागिरी (प्रतिनिधी): स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आपल्या व्यवसायात कमालीचे सातत्य राखत ७०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. संस्थेच्या ठेवी आणि कर्ज यांचा एकत्रित संमिश्र व्यवसाय ७०० कोटींच्या पलीकडे नेण्यात संस्थेला यश आले असून, ही एक मोठी आर्थिक उपलब्धी असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना ॲड. पटवर्धन यांनी सांगितले की, सध्या संस्थेच्या ठेवी ४०१ कोटी २२ लाख रुपये, तर कर्जवाटप २९८ कोटी ८६ लाख ८ हजार रुपये इतके झाले आहे. अशा प्रकारे संस्थेने ७०० कोटींचा संमिश्र व्यवसायाचा इष्टांक पूर्ण केला आहे. केवळ ३०० सभासद आणि १० हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला हा प्रवास आज ४९ हजार सभासदांच्या विश्वासापर्यंत पोहोचला असून, संस्थेचा विस्तार आता १७ शाखांसह संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात झाला आहे.
संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीची माहिती देताना त्यांनी नमूद केले की, संस्थेकडे १६९ कोटींची बँक गुंतवणूक, ५२ कोटींचा भक्कम स्वनिधी आणि ९९.७०% इतकी विक्रमी कर्ज वसुली आहे. विशेष म्हणजे संस्थेचा नेट NPA ०% असून, सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग आणि २८% भांडवल पर्याप्तता राखली आहे. संस्थेचा निव्वळ नफा १० कोटींच्या घरात पोहोचला आहे.
“आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि उत्तम ग्राहक सेवा ही आमची ब्रीदवाक्ये आहेत. गेली ३४ वर्षे सहकार तत्व आणि व्यावसायिकता यांचा संगम साधल्यामुळेच हे यश मिळाले आहे. ७०० कोटींचा टप्पा ही एक मोठी ‘अॅचिव्हमेंट’ असून आता आमचे पुढील ध्येय १००० कोटींच्या व्यवसायाचे आहे,” असे भावोद्गार ॲड. पटवर्धन यांनी काढले. या यशस्वी प्रवासात सभासद, ग्राहक आणि कर्मचारी वर्गाचे योगदान अनमोल असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.









