रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काळात हवामानात बदल होण्याची शक्यता असून, ३ मार्चपासून कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वर्तवला आहे. या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता नसली तरी कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे पिकांचे आणि पशुधनाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा व काजू बागायतदारांसाठी सूचना: आंबा पिकामध्ये फळधारणा झाली असल्यास, फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि फळगळ रोखण्यासाठी प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. बागेत तुडतुड्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी, मात्र परागीभवनाच्या काळात ती टाळावी. फळांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळांना कागदी पिशव्यांचे आवरण (बॅगिंग) घालण्याचा व फळमाशी रक्षक सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काजू पिकामध्ये बोंड व बी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉसची फवारणी करावी.
नारळ व सुपारी बागांचे व्यवस्थापन: नव्याने लागवड केलेल्या नारळ व सुपारीच्या रोपांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी शेडनेट किंवा झावळ्यांच्या साहाय्याने सावली करावी. पाच वर्षांवरील नारळाच्या माडांना खतांची तिसरी मात्रा देऊन लगेच पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे दररोज सुमारे ४० लिटर पाणी देणे आवश्यक आहे.
भाजीपाला व इतर पिके: कलिंगड काढणीस तयार झाले असल्यास त्याचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवावीत. उन्हाळी भेंडीची लागवड करताना कोकण भेंडी, परभणी क्रांती यांसारख्या सुधारित जातींची निवड करावी. मूग व चवळी पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे, जेणेकरून उत्पादनात घट होणार नाही.
पशुपालन व कुक्कुटपालन: वाढत्या तापमानामुळे पशुधनाला दिवसभर पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांना चरण्यास बाहेर सोडू नये आणि त्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. कुक्कुटपालनामध्ये शेडच्या छतावर गवत किंवा झावळ्या टाकाव्यात आणि पक्षांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने केले आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने केले आहे.













