कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मेगा स्पेशालिटी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

अखेर पर्यंत ११३४ रुग्णांची तपासणी

कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आज मेगा स्पेशालिटी कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पला तालुक्यातून नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत एकूण ११३४ लाभार्थींनी विविध तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यसेवा घेतली.

या मेगा स्पेशालिटी कॅम्पमध्ये हृदयरोग, शल्यचिकित्सा, पोटाचे विकार, स्त्रीरोग, कर्करोग, अस्थिरोग, बालरोग, बालअस्थिरोग, मूत्रविकार तसेच कान – नाक – घसा या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी सल्ला देखील देण्यात आला आहे.

सदरील मेगा स्पेशालिटी कॅम्प मध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये पुढीलप्रमाणे सेवा देण्यात आली. १) USG – १५२, २) CT Scan – ६४, ३) रक्त तपासणी – ७५४, ४) 2D ECHO – ११९, ५) X-Ray – १५१, ६) ECG – १२२ अशा रुग्णांना सेवा देण्यात आल्या.

मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील रुग्णांना अशा प्रकारच्या मेगा कॅम्पमुळे मोठा दिलासा मिळत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.