सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर : भुयारी गटार योजना आणि श्वान निर्बीजीकरणावर विशेष भर


​सावंतवाडी । प्रतिनिधी : “शहरातील मोती तलावात उभारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन प्रकल्प निविदेतील अटींनुसार पूर्ण झालेला नाही. जोपर्यंत या कामाची गुणवत्ता सिद्ध होत नाही आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला उर्वरित बिल अदा केले जाणार नाही. प्रशासकीय काळात झालेल्या या अर्धवट कामाची नैतिक जबाबदारी सत्ताधारी म्हणून आम्ही घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शुक्रवारी दिला.
​सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडतानाच प्रलंबित प्रकल्पांवरून प्रशासनाला आणि ठेकेदारांना खडे बोल सुनावले.
​फाउंटन प्रकल्पाचे वाभाडे
​मोती तलावातील कारंजाच्या कामावरून शहरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना निरवडेकर म्हणाले की, “हा प्रकल्प पूर्णपणे दर्जेदार झाल्याशिवाय त्याचे हस्तांतरण स्वीकारले जाणार नाही. कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रकल्पाची सविस्तर माहिती आम्ही घेतली असून, टेंडरनुसार काम पूर्ण झाल्याशिवाय पालिकेची तिजोरी उघडली जाणार नाही.”
​प्रलंबित भुयारी गटार योजनेला गती
​२०११ पासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. या योजनेची फाईल पुन्हा उघडण्यात आली असून, संपूर्ण शहराचा सूक्ष्म अभ्यास करून योजनेचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एका ‘विशेष तज्ञ समिती’चे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​”भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, येत्या पाच वर्षांत जनतेने दिलेल्या मताची ‘पोचपावती’ केवळ शब्दांतून नव्हे तर कृतीतून आणि विकासातून देऊ.”
— ॲड. अनिल निरवडेकर, प्रभारी नगराध्यक्ष