घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘सिनर्जी–२०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवात

खेड (प्रतिनिधी) – लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘सिनर्जी–२०२६’ ची दिमाखदार आणि उत्साहपूर्ण सुरुवात झाली. दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस आनंद, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक उत्साहाने भरलेला ठरला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘आर्ट गॅलरी’ चे उद्घाटन करण्यात आले. या कला दालनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि सृजनशीलतेचा आविष्कार सादर केला. चित्ररेखाटन, रांगोळी, छायाचित्रण, सुलेखन तसेच नैसर्गिक वस्तूंच्या वापरातून तयार केलेल्या शोभायमान वस्तूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विविध कलाकृतींमधून विद्यार्थ्यांच्या कलात्मक दृष्टीचा आणि मेहनतीचा प्रत्यय आला.
यानंतर क्रीडा, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. एस. के. ढवळे व श्री. एस. जी. बोले यांच्यासह सर्व शाखा प्रमुख आणि सिनर्जी–२०२६ चे समन्वयक श्री. विक्रमसिंह जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
दिवसभर चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत अधिकच वाढवली. अंताक्षरी, नृत्य, गायन, वादन, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहण्यासारखा होता.
अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात सिनर्जी–२०२६ चा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेजचे विद्यार्थी सचिव कु. वेदांत शिंदे आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. सई दळवी यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.