खमेनींच्या हत्येनंतर कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला; चकमकीत ६ जण ठार

अमेरिका-इस्रायल संयुक्त हवाई कारवाईनंतर पाकिस्तानात तणाव
इराणकडून बदला घेण्याची घोषणा; ट्रम्प यांचा कठोर इशारा

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील कराची येथे हिंसक निदर्शने उसळली. संतप्त जमावाने अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला केल्याने पोलिसांशी चकमक झाली आणि किमान सहा निदर्शकांचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणा करत इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे.


कराची/पुणे : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानातील कराची येथे संतप्त जमावाने अमेरिकन वाणिज्य दूतावासावर रविवारी हल्ला चढवला. या वेळी पोलिस व निमलष्करी दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान सहा निदर्शक ठार झाले.

आंदोलकांनी मालमत्तेची तोडफोड करत इमारतीच्या काही भागांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. अनेक जण जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजार यांनी कराचीचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आझाद खान यांच्याकडून तातडीचा अहवाल मागवला आहे. गोंधळामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून सुलतानाबाद ते माई कोलाची मार्गावरील दोन्ही बाजू बंद करण्यात आल्या.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई कारवाईत खमेनी ठार झाल्याची इराणने पुष्टी केली. “ऑपरेशन एपिक फ्युरी” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारवाईनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

खमेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याचे जाहीर करत इराणने इस्रायल व आखाती अरब राष्ट्रांवर क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला. रिव्होल्यूशनरी गार्डने अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला “जगासाठी मोठा दिवस” असे संबोधत इराणने कोणतीही प्रतिहल्ल्याची कारवाई करू नये, असा इशारा दिला. इराणने हल्ला केल्यास अमेरिका “पूर्वी कधीही न पाहिलेल्या शक्तीने प्रत्युत्तर देईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने इस्रायलसोबतच्या संयुक्त मोहिमेच्या पहिल्या १२ तासांत जवळपास ९०० हल्ले केल्याचा दावा केला आहे. या घटनांमुळे मध्यपूर्वेत तणाव अधिकच वाढला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.