तुळस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल ॲप द्वारे अनुभवली प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया

नाविन्यपूर्ण प्रयोग : पुष्कर पेडणेकर याची मुख्यमंत्रीपदी निवड

वेंगुर्ले : दाजी नाईक : रयत शिक्षण संस्थेच्या तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदान प्रक्रिया स्वतः सहभाग घेऊन प्रत्यक्ष अनुभवली. निमित्त होत शालेय मंत्रिमंडळ नियुक्त करण्याचे. शिक्षकांनी मोबाईल ॲप “Voting Machine” द्वारे ही प्रक्रिया घडवून आणून या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाविषयी जागृती केली. हायस्कूलच्या या वेगळ्या उपक्रमाचे पालकांसह गावातही कौतुक होत आहे.

शालेय जीवनात शिक्षणाबरोबर अन्य विषयांच्या प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जात असतात. त्याचाच हा एक भाग होता. मोबाईल ॲप मध्ये जसे खरोखरच्या व्होटिंग मशीन मध्ये उमेदवारांची नावे , चिन्हे ,आणि त्यांच्या समोर बटण अशीच व्यवस्था या ॲप मध्ये असल्याने मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांना आवश्यक असणारी चिन्हे प्रथम देण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना एक दिवस प्रचारासाठी देण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर काय करू याविषयी प्रचार केला दुसऱ्या दिवशी मतदानाची सर्व व्यवस्था करण्यात आली.

त्यानंतर मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा शाळेचे आय कार्ड घेऊन येण्याविषयी सांगण्यात आले.

शुक्रवारी २८ जुलै रोजी हायस्कूल मध्ये सायंकाळी ३ वाजता मतदान सुरू करण्यात आले, तीन ते चार या वेळामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील एकूण ११८ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व विद्यार्थी आनंदाने मतदान करत होते. त्यांच्या बोटांवर लावलेली शाई एकमेकांना दाखवून मी पण मतदान केले हे एकमेकांना सांगत होते.

अशाप्रकारे विद्यालयामध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या मदतीने लोकशाही पद्धतीने मतदान करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खरोखरच्या निवडणुकीप्रमाणे अनुभव देता आला. ही नाविन्यपूर्ण कल्पना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप तुळसकर सर यांनी मांडली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. यामध्ये केंद्राध्यक्ष म्हणून श्री सूर्यकांत सुतार सर यांनी काम पाहिले मतदानाधिकारी क्रमांक १ म्हणून सौ अश्विनी आडके मॅडम यांनी काम पाहिले, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून श्री बाबासो चौगुले सर यांनी काम पाहिले मतदान अधिकारी क्र ३ म्हणून श्री संदीप तुळसकर सर यांनी काम पाहिले. या सर्व लोकशाही प्रमाणे चाललेल्या मतदानाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण देसाई सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शेवटी मतमोजणी करून विजेता ठरलेल्या इयत्ता दहावीतील कु. पुष्कर पेडणेकर याची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तसेच इतर विद्यार्थ्यांना अन्य मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले.

सर्व मंत्रिमंडळाला भावी वाटचालीसाठी मुख्याध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.