दोन्ही पुलांसाठी २९ कोटी २७ लाखांचा होणार खर्च
चिपळूण (प्रतिनिधी)- : पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरील पूल खचल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या पुलाच्या पुनर्बाधणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) निविदा जाहीर केली आहे. या पुलासह कालव्यावरील (कॅनॉलवरील) पुलाची पुनर्बाधणी करण्यात येणार असून दोन्ही पुलांसाठी एकूण २९ कोटी २७ लाख ७९ हजार ९८२ रुपयांचा खर्च येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात पिंपळी-खडपोली पूल खचल्याने दसपटी, खडपोली एमआयडीसी परिसरासह आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थ आणि उद्योजकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी म्हणून पेढांबे मार्ग अरुंद असल्याने आणि अवजड वाहनांसाठी शिरगांवमार्गे मोठा वळसा घ्यावा तागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन १५ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोकण विभागाचे मुख्य अभियंता सचिन राक्षे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पाहणीनंतर पुनर्बाधणीची प्रक्रिया गतीमान झाली.
जुन्या पुलाचीही पुनर्बाधणी करण्यात येणार असून, ४० ते ४५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी दोन्ही पुलांसाठी माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्यात आले. अखेर एमआयडीसीने या दोन्ही पुलांसाठी निविदा दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे.












