विवाह संकेतस्थळावर ओळख; लग्नाच्या बहाण्याने पैसे उकळले
१६.६५ लाख रुपये जप्त; आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत
इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे सांगून एका सॉफ्टवेअर अभियंत्या महिलेकडून ४२.६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवाह संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने टप्प्याटप्प्याने रक्कम उकळली. वाकड पोलिसांनी अलिबाग येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत १६.६५ लाख रुपये जप्त केले असून उर्वरित रक्कमेचा शोध सुरू आहे. आरोपी सध्या नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून पुढील कारवाई सुरू आहे.
पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)मध्ये शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याची ४२.६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग (जि. रायगड) येथील व्यक्तीविरुद्ध वाकड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
वाकड पोलिसांचे निरीक्षक किशोर पाटील यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. तिने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली असता जयेश पाटील या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून आरोपीने स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपीने महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि वाकड येथे येऊन तिची भेट घेतली. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने विविध कारणे देत तिच्याकडून रक्कम मागण्यास सुरुवात केली. लग्नानंतर दोघांसाठी जमीन व मालमत्ता खरेदी करण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्याचे तपासात समोर आले.
नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत आरोपीने एकूण ४२.६४ लाख रुपये घेतले. नंतर तो इस्रोशी संबंधित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने ऑनलाइन तक्रार दाखल केली.
निरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून एकूण रकमेपैकी १६.६५ लाख रुपये जप्त केले आहेत. उर्वरित सुमारे २७ लाख रुपयांचा शोध सुरू आहे.
तपासात आरोपीचे खरे नाव जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे (वय ३६, रा. अलिबाग) असल्याचे स्पष्ट झाले. त्याला यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. आणखी एका अभियंत्याने त्याच्याविरोधात तक्रार दिल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने अनेक सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि ती रक्कम ऐषारामी जीवनशैली तसेच गोव्यातील कॅसिनोमध्ये खर्च केल्याचा संशय आहे. सध्या आरोपी ४ मार्चपर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून त्यानंतर न्यायालयाकडून कोठडी मागण्यात येणार आहे.









