सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये नव्या नर वाघाची नोंद; ‘STR T9’ ला स्थानिकांकडून ‘शिलेदार’ नाव

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या नर वाघाची अधिकृत नोंद झाली आहे. या वाघाला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून, स्थानिक गाईड मंडळींनी त्याचे ‘शिलेदार’ असे नामकरण केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ वनविभागाच्या कॅमेरात कैद झाले आहेत. सध्या हा T9 वाघ T5 ‘तारा’ हिच्या क्षेत्रात तिच्या मागे फिरताना आढळत आहे.

या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या आता सात झाली आहे. सध्या प्रकल्पात पुढील वाघांची नोंद आहे:

T1 – सेनापती

T2 – सुभेदार

T3 – बाजी

T4 – चंदा

T5 – तारा

T6 – हिरकणी

T9 – शिलेदार

विशेष म्हणजे T5 ‘तारा’ या वाघिणीच्या क्षेत्रात सध्या T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने आलेला T9 शिलेदार असे तीन नर वाघ फिरत आहेत. त्यामुळे तारा कोणत्या नराची निवड करते, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी ही माहिती दिली. तर मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले की, ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून यामुळे येथील जैवविविधता अधोरेखित होते.

सह्याद्रीला जोडणारे राधानगरी तसेच तिलारी-दोडामार्ग येथील जंगल क्षेत्र वाघांच्या स्थलांतर व प्रजननासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘सह्याद्री कोकण टायगर’ SKT 21 या वाघाचे पहिले छायाचित्र डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये दाजीपूर येथे तो आढळला. या हालचालींवरून तो टायगर कॉरिडॉरमधून उत्तरेकडे स्थलांतर करत असल्याचे स्पष्ट झाले होते.

जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोंदवला गेला आहे. हा तरुण नर वाघ योग्य अधिवासाच्या शोधात स्थलांतर करत असून, सह्याद्रीकडे जाणारा कॉरिडॉर वाघ संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी सांगितले.