संपर्काचा अचानक अंत; उत्तरांच्या प्रतीक्षेत राहणारी व्यक्ती
घोस्टिंगनंतर ‘घोस्टलाइटिंग’ची भर; मानसिक खेळ अधिक त्रासदायक
डेटिंगच्या जगात ‘घोस्टिंग’ हा शब्द आता सर्वपरिचित झाला आहे. एखादी व्यक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संपर्क तोडते, यालाच घोस्टिंग म्हणतात. यामुळे समोरची व्यक्ती गोंधळलेली, दुखावलेली आणि आत्मसंशयाने ग्रासलेली राहते. कोणतेही स्पष्टीकरण किंवा समारोप न मिळाल्याने मानसिक ताण वाढतो. याच प्रकाराची अधिक गुंतागुंतीची पायरी म्हणजे ‘घोस्टलाइटिंग’, ज्यात आधी मानसिक खेळ खेळून नंतर गायब होण्याची पद्धत वापरली जाते.
मुंबई : आधुनिक डेटिंग संस्कृतीत ‘घोस्टिंग’ हा प्रकार झपाट्याने वाढताना दिसतो. एखादी व्यक्ती अचानक मेसेज, कॉल किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता संपर्क तोडते, तेव्हा त्याला घोस्टिंग असे म्हटले जाते. केंब्रिज डिक्शनरीनुसार, हा म्हणजे संपर्काचा अचानक अंत होय. या कृतीमुळे समोरची व्यक्ती वारंवार फोनकडे पाहत राहते, संभाषणातील प्रत्येक क्षण आठवत राहते आणि स्वतःलाच प्रश्न विचारत राहते.
घोस्टिंग हा एखाद्याला न सांगता दूर जाण्याचा निष्क्रिय-आक्रमक मार्ग मानला जातो. यात पीडितेला कोणताही क्लोजर मिळत नाही, त्यामुळे ती व्यक्ती गोंधळलेली आणि आत्मसंशयाने भरलेली राहते. “मी काय चूक केली?” हा प्रश्न मनात सतत घोळत राहतो. सोशल मीडियावर डीएम रिफ्रेश करत बसणे किंवा प्रतिसादाची वाट पाहणे, ही अनेकांची सामान्य अनुभूती आहे.
हा प्रकार केवळ प्रेमसंबंधांपुरता मर्यादित नसून मैत्री, व्यावसायिक नातेसंबंध आणि नोकरीच्या क्षेत्रातही दिसून येतो. मानवी स्वभावानुसार प्रत्येकाला स्पष्टीकरण आणि समजून घेण्याची अपेक्षा असते. मात्र घोस्टिंग जणू सांगते की, “तुम्ही स्पष्टीकरणास पात्र नाही.”
याचाच पुढील टप्पा म्हणजे ‘घोस्टलाइटिंग’. यात व्यक्ती आधी मानसिक खेळ, भावनिक गोंधळ किंवा मॅनिप्युलेशन करते आणि नंतर पूर्णपणे गायब होते. त्यामुळे हा अनुभव अधिक त्रासदायक ठरतो. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःच्या भावनांना महत्त्व देणे आणि पुढे जाणे अधिक गरजेचे मानले जाते.











