महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांचे आदेश
रत्नागिरी : महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असून, वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे चालू बिल व थकबाकी वसूल करा. रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शून्य थकबाकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करा. ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्याच्या दृष्टीने यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करा, अशा सुचना महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिल्या.
महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात रत्नागिरी विभागाची आढावा बैठक घेताना मुख्यालयातील कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, सहायक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकणीस, नितीन पळसुळेदेसाई, जितेंद्र फुलपगारे, अनुराधा आंधनसरे, प्रणाली विश्लेषक समीर सिंघम, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद कानडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर म्हणाले, रत्नागिरी विभागात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर वर्गवारीतील 31 हजार 817 इतक्या ग्राहकांकडे 3 कोटी 53 लाख इतक्या रुपयांची थकबाकी आहे. ‘थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा. उच्चदाब ग्राहकांच्या वसुलीकडे प्राधान्याने लक्ष द्या. थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडल्यानंतर त्यांनी पुनरजोडणी शुल्क भरल्यानंतर वीज जोडणी करा. काही ग्राहक थकबाकी ठेवून चालू बिल भारतात. अशाही ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे आदेश कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिले.
या आढावा बैठकीला रत्नागिरी विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











