राजापूर : प्रतिनिधी गुरुवर्य द.ज. सरदेशपांडे अध्यापक विद्यालय, कोदवली-राजापूर येथील सहाय्यक शिक्षक प्रा. श्री. रणजित हणमंतराव देसाई यांना वर्ष २०२५-२०२६ चा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक असोसिएशन सोलापूर आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे श्रीमती सुशीलादेवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) या विषयावरील राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला.
धाराशिव येथे १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या परिषदेत पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. देसाई हे सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या शिक्षणशास्त्र विभागांतर्गत ‘गणितीय साक्षरता’ या विषयावर आपले पीएच.डी.चे संशोधन कार्य करत आहेत. या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या संशोधनाला तज्ज्ञांच्या पॅनलकडून उत्कृष्ट नामांकनासाठी निवडण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक संशोधकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यातून प्रा. देसाई यांनी आपल्या संशोधनाचे प्रभावी सादरीकरण करत या मानाच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार नामांकन प्रमाणपत्र, सन्मानपत्र आणि ५ हजार रुपये रोख असे आहे. श्री स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूरचे विद्या समिती प्रमुख श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते प्रा. देसाई यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला.
या यशाबद्दल बोलताना प्रा. देसाई यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. युवराज पवार (प्रोफेसर, श्रीम. पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली) यांना दिले. तसेच राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक श्री. प्रकाशजी भावे, अध्यक्ष डॉ. सौ. छाया जोशी, उपाध्यक्ष श्री. अभयजी मेळेकर, कार्यवाहक श्री. जगदीशजी ठोसर-पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या संशोधन कार्यात मिळालेले कुटुंब, मित्र परिवार आणि तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य हेच गुणवत्तापूर्ण कार्यासाठी ऊर्जा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











