एकाच ठिकाणी महसूल सेवा, दाखले व तक्रार निवारण; नागरिकांनी लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व तहसीलदार सुधीर सोनावणे यांचे आवाहन
खेड – राकेश कोळी :
खेड तालुक्यात महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना अधिक सुलभ व जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय, खेड यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी ‘सिंगल विंडो’ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल विभागाच्या सेवा अधिक गतिमान करणे, प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे हा आहे. यामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज कमी होऊन अनेक कामे एकाच दिवशी पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना वारस तपास, फेरफार (फरफार) नोंदी, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, डिजिटल ७/१२ वितरण यांसारख्या महसूल सेवांचा लाभ मिळणार आहे. तसेच उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमी लेयर यांसारखी विविध प्रमाणपत्रे देखील शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी ई-मोजणी सेवा, आधार संबंधित सेवा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, आरोग्य शिबीर तसेच आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यांसारख्या विविध सेवांचाही समावेश करण्यात आला आहे. डिजिटल सेवा व ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ प्रणालीचा प्रभावी वापर करून नागरिकांची कामे शक्य तितक्या कमी वेळात पूर्ण करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
महसूल विषयक दैनंदिन तक्रारी एकाच ठिकाणी स्वीकारून त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा शिबिरात कार्यरत राहणार आहे. तसेच जमीन विषयक विविध प्रकरणांबाबत मार्गदर्शन, जनजागृती तसेच कायदेशीर प्रक्रियेबाबत सविस्तर माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळानुसार आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शिबिरांच्या निश्चित तारखेनुसार उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.











