​सावंतवाडी पोलीस ठाण्याचा कारभार ‘नारीशक्ती’च्या हाती

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

​सावंतवाडी । प्रतिनिधी : “आजचे युग हे स्त्रीशक्तीचे आहे. जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, महिलांनी तिथे आपला ठसा उमटवला आहे. केवळ एक दिवसाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आज सावंतवाडी पोलीस ठाण्याची संपूर्ण धुरा महिलांकडे सोपवून ‘महिला पोलीस ठाणे’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे,” असे प्रतिपादन सिंधुदूर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले.
​जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्वेता खाडे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
​ठाणे अंमलदार ते चालक; सगळीकडे महिलाच!
​महिला दिनानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला. पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी आज ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. केवळ प्रभारीच नव्हे, तर गुन्हे प्रकटीकरण शाखा, ११२ हेल्पलाईन, वायरलेस विभाग, ठाणे अंमलदार, वाहतूक नियमन आणि अगदी पोलीस वाहनाचे चालक म्हणूनही महिला पोलिसांनीच अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावले. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात महिलांच्या या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत होते.

​’नारीशक्ती’चा सन्मान आणि मार्गदर्शन
​अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी महिलांच्या अष्टपैलू कामगिरीवर प्रकाश टाकला. “महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. दिवस-रात्र स्वतःच्या कुटुंबाची आणि समाजाची तमा न बाळगता सेवा देणाऱ्या या नारीशक्तीचा गौरव करणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
​या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींची उपस्थिती. या किशोरवयीन मुलींना महिला व बालकांविषयक कायद्यांची माहिती देण्यात आली. तसेच, संकटसमयी स्वतःचे रक्षण कसे करावे, याबद्दल स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात आले.
​गुणवंतांचा गौरव
​राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत मुलींचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.