संगमेश्वर पं. स. च्या सभापतीपदी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांची बिनविरोध निवड

निलेश जाधव / देवरूख:

संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोघांची निवड होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुछ देत दोघांचेही अभिनंदन केले. तर निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे समस्त तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी सभापती व उपसभापतींची निवड प्रक्रिया होणार असल्याने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये निवडीविषयी चर्चा करण्यात आली. व चर्चेअंती सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शर्वरी वेल्ये व उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांचेही अर्ज भरण्यात आले.

दुसरा कोणीही अर्ज न भरल्यामुळे सभापतीपदी शर्वरी वेल्ये व उपसभापती प्रफुल्ल बाईत यांची बिनविरोध निवड झाल्याची महायुतीच्या नेत्यांकडून घोषणा करण्यात आली. अशाप्रकारे ही निवड प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जि. प. सदस्या पूजा निकम, भाजपचे जि. प. सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह सर्व पं. स. सदस्य व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहूल पंडीत, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव, पूजा निकम यांनी नुतन सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देताना त्यांनी संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, सर्वांना सोबत घेवून काम करावे. तालुक्याच्या विकासाची घौडदौड अशीच कायम ठेवावी. तालुक्याचा कायापालट करायचा आहे. हे लक्षात ठेवून कामाला लागावे, अशाप्रकारची अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रत्येक दिवस हा जनतेच्या सेवेसाठी द्यावा, असेही म्हटले. तर नुतन सभापती व उपसभापती यांनी आपल्यावर वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असून या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. जनतेची सेवा व त्यांची कामे करण्यासाठीच या पदावर आम्हाला बसवण्यात आले आहे, याची जाणीव आम्हाला असून तालुक्याचा विकास करण्यावर आमचा भर राहिल, असे सांगितले. यानंतर नुतन सभापती व उपसभापती यांना त्यांच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.