आपत्कालीन निधीतून आपले डंपर फिरावेत यासाठी आमदारांचे प्रयत्न ; मनसे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर यांची टीका
मालवण | प्रतिनिधी : बंधारा प्रश्नी तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी वैभव नाईक तिथून पळून गेले होते. त्यानंतर आपत्कालीन निधीतून बंधारा बांधण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. तसेच किनारपट्टी व नदीकडील भागातून भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जातील असेही सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले हे आमदारांनी स्पष्ट करावे. आपत्कालीन निधीतून आपले डंपर फिरावेत यासाठीच आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आपत्तीचा प्रश्न पुढे करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे चित्र आमदार नाईक निर्माण करत आहेत. अशी खरमरीत टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
सागरी अतिक्रमण वेळी ज्यावेळी ग्रामस्थ जीव मुठीत धरून असतात त्यावेळी अशा प्रकारे आपत्कालीन निधीतून काम केले जाईल अशी दिखाऊ वक्तव्य आमदार नाईक करतात. इतर वेळी आमदार फिरकत देखील नाही. जेटी लाटांच्या तडाख्यात वाहून जाणार हे माहीत असताना होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना का केली नाही? प्रत्येक वेळी आपत्कालीन निधी वापरणार काय?आमदार फंड खासदार फंड का देऊ शकत नाही? सभागृहात प्रश्न का उपस्थित करू शकत नाहीत? मागील काळात सरकार असताना निधी का आणू शकले नाहीत? पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तळाशील तोंडवळी संबंधी बैठका का घेत नाहीत ? मागच्या वेळी आपत्कालीन निधीतून काम सुरू असताना त्या कामावर फिरणारे डंपर कोणाचे होते ? असे अनेक सवाल अमित इब्रामपूरकर यांनी उपस्थित केले आहेत.
आमदार वैभव नाईक यांची ही शेवटची टर्म आहे. पुढच्या वर्षी निवडणुका आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल. असेही अमित इब्रामपू रकर यांनी म्हटले आहे.












