दहशतवाद्यांचे आंबोली कनेक्शन…!

क्राइम फाईल… संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात दहशतवादी संघटना कार्यरत असल्याची एटीएसला कुणकुण लागली होती. त्यातच पुणे पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरटे म्हणून त्यांना ताब्यात घेतले. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद याकूब साकी या दोघांकडे एटीएसच्या टिमने अधिक चौकशी केल्यावर महाराष्ट्र पोलिसांना धक्का बसेल अशी माहिती समोर आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा भागातील जंगलांमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि सराव केल्याच समोर आले आहे. यात कोकणसाठी धक्कादायक बाब म्हणजे आंबोलीच्या जंगलमय परिसरात या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतले. बॉम्बस्फोटाचा सराव केला. एटीएसच्या पथकाने त्या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी आंबोलीच्या जंगलात सराव केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाची रेकी या दहशतवाद्यांनी केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील जंगलांमध्ये तंबू ठोकून त्यांनी सराव केला आहे. ही गंभिर बाब आहे. आंबोली गुन्हेगारांना फार सुरक्षित वाटत आहे. म्हणूनच कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र येथे मर्डर करून आंबोलीच्या जंगलमय भागात मुडदे फेकले जातात. असे अनेक खुनांचे प्रकार झाले आहेत. त्यातले काही उघड झाले तर काही कोणताही तपास न करता फाईलबंद झाली आहे. यामुळे आंबोली हे जसे निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून सर्वांच्या परिचयाचे प्रसिद्ध आहे. हजारो पर्यटक पर्यटनासाठी आंबोलीत येतात. गेल्याकाही वर्षात आंबोली पर्यटनस्थळ म्हणून कोकणातील या पर्यटनस्थळाला सर्वाधिक पसंती आहे. पावसाळी हंगामात तर या पर्यटनस्थळाला हजारो पर्यटक येत असतात. पुणे एटीएसने पकडलेले हे दहशतवादी पर्यटक म्हणूनच कोकणात आले असणार त्यांना कोणतीही अडचण, अडथळा न होता आंबोलीस्थळी येता आलं असणार दहशतवादी आंबोलीत येतात. सराव करतात, प्रशिक्षण देतात आणि तरीही या संबंधी कोणतीही माहिती पोलिसांना नसते ही बाब फारच गंभिर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात दोन-चार गोवा बनावटी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना सतावणारे वाहतुक पोलिस जागो-जागी दिसतात. गाड्यांच्या तपासणीच्या नावाखाली पोलिस फार त्रास देत असतात.
एखाद्या कारमध्ये चार दारूच्या बाटल्या पकडल्या की त्या कारचालकाला ‘ब्लॅकमेलिंग’ करता येते. हे सऱ्हास चालू असते. हा राजरोस खाकीवर्दीआड चाललेला सारा खेळ आहे. हे सर्वांना माहित आहे. यात फार सुधारणा घडण्याची आवश्यकता आहे. कोकणात कधीही काहीही होऊ शकते. याचे कारण पोलिस फार गाफिल आहेत. त्यांना यापुढच्या काळात अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. परंतु गेल्या चार दिवसात कोकणातील पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसत नाही. आजही कोकणातील जे पोलिस तपासनाकी उभी आहेत त्या पोलिस चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलिस नेमक काय आणि कसं कर्तव्य पार पाडतात यासाठी या चेकनाक्यांच्या ५०० मिटर परिघात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा म्हणजे सर्वकाही समोर येईल. जेव्हा घाटमार्ग काही कारणास्तव वाहतुकीला बंद असतात तेव्हा कुणाच्या आशीर्वादाने ट्रक वाहतुक सुरू असते. चेकनाक्यांवर गोवा बनावटीची दारू पकडल्याचे नाटक चालते. त्याचे देखिल फार गंमतीदार खिस्से आहेत. दहशतवादी आपल्या भागात फिरून, राहून जातात. तरीही गुप्तवार्ता पोलिसांना त्याची कुठलीही खबर लागत नाही. पोलिसांचे नेटवर्क कमी पडतय. यात कोकणातील सर्वच पोलिस अधिक्षकांनी लक्ष घातल पाहिजे. आज या विषयावर अधिक गंभिरपणे लिहिण्याला काही कारण आहे. यात केवळ पोलिसांचे दोष दाखवावे एवढाच माझा हेतू नाही. तर दहशतवादी कारवाया करणारे कोकणात येऊन जात असतील तर फार गंभिरतेने घेण्याची गरज आहे. कोकणातील रहाणारे सहज बोलून जातात. कोकणात कोण कशाला मरायला येणार आहे ? या प्रश्नाभोवती नेहमी चर्चा घडवली जाते परंतु याच कोकणातील रायगड जिल्ह्यात मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरडीएक्ससह स्फोटक उतरवली होती. त्यावेळच्या कस्टम आणि पोलिसांनी केवळ काही पैसे मिळतात म्हणून स्मगलिंगचा माल समजून स्फोटक उतरवू दिली होती. याची आजच्या या लेखात आठवण एवढ्याचसाठी झाली. घटना घडल्यानंतर अरेरे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आंबोली घाटात येणारे पर्यटक यांच्याही बेशिस्तीला लगाम घातला पाहिजे. खरंतर या घाटरस्त्याची दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. साईडपट्टी नसल्याने मोटरसायकल खाली कोसळण्याची शक्यताही आहे. दहशतवादी कारवायांच्या निमित्ताने कोकणातील पोलिसयंत्रणा अधिक सतर्क आणि सक्रिय असायला हवी. हुजूरांनी दिलेले आदेश, सुचना पोलिसदलातील इतरांकडुन पाळल्या जातात की नाही हे आता हुजूरानाच पहावे लागणार आहे. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल हे निश्चितपणे यापुढच्याकाळात अधिक सतर्क होतील अशी अपेक्षा..!