कसाल येथे १४ मार्चला ‘महाराजस्व समाधान शिबिर’;

महसूल विभागाच्या १५ सेवांचा एकाच ठिकाणी लाभ


स्वप्निल कदम (कुडाळ) :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ स्तरावर विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कसाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी दिली.

या शिबिरामध्ये कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाच्या सुमारे १५ महत्त्वाच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आदी सेवांचा समावेश या शिबिरात आहे.

तसेच अकृषी परवानगी व संबंधित तरतुदींविषयी मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, संजय गांधी निराधार योजना व इतर सामाजिक सहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टेवाटप व इमोजणी अर्ज स्वीकारणे अशी कामेही या शिबिरात केली जाणार आहेत.

याशिवाय AgriStack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्याबाबतची प्रकरणे, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्डवरील नाव कमी-जास्त करणे, भूसंपादन व अकृषी परवानगी संदर्भातील पत्रके तयार करणे तसेच गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामेही करण्यात येणार आहेत. संबंधित सेवांसाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.

कसाल मंडळातील गावांमधील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी केले आहे.