माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रमोद रावराणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील विकासापासून वंचित राहीलेल्या धनगर वस्त्यांना विकास प्रक्रियेत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. वन विभागाच्या जाचक अटी व शर्तीत अडकलेल्या रस्त्यांना परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्सविकास खात्याचे माजी मंत्री, मा. आमदार महादेव जानकर यांनी दिली.
श्री जानकर यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा केली. तालुक्यातील दुर्गम भागांतील वाडीवस्ती वरील विशेषतः डोंगर दर्यात असलेल्या धनगर वस्तीतील समस्या जाणुन घेतल्या.करुळ केगदवाडी या धनगर वस्तीच्या चारही बाजूने वन विभागाची जमीन आहे. या वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाडी विकासापासून वंचित राहिली आहे. करुळ – नावळे रस्ता हा मुख्य जिल्हा मार्ग आहे. या मार्गावर वन विभागाची 150 मीटर जमीन लागते. या खात्याची परवानगी न मिळाल्याने रस्ता अडकला आहे. ऐनारी – मौदे रस्त्याची अवस्था ही तशीच आहे. आदी प्रश्ना विषयी प्रमोद रावराणे यांनी श्री जानकर यांचे लक्ष वेधले.रस्ते, पाणि, लाईट या मुलभुत सुविधांपासुन वंचित असलेल्या सर्व धनगर वस्त्यांचा सर्वे करून आवश्यक त्या ठीकाणी भुसंपादन करून येथील प्रश्न सोडविण्याची मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सहकारी (NDA) मित्र पक्षाचे नेते, श्री महादेवजी जानकर यांच्याकडे प्रमोद रावराणे यांनी केली. सदर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.












