बालिंगा पुल जवळील पुराच्या पाण्याची धोक्याची पातळी झाली कमी
वैभववाडी प्रतिनिधी
कोल्हापूर बालिंगा येथील पुल अवजड वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. मार्ग सुरू झाल्याने गगनबावडा, करुळ घाट व वैभववाडी मार्गावरुन धावणा-या लांबपल्याच्या गाड्या सकाळपासून सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने बालिंगा येथील पुलाला पुराच्या पाण्यामुळे धोका असल्याचे सांगत हा पुल वाहतुकीसाठी बंद केला. गेले आठ दिवस वाहतूक बंद होती. सोमवार सकाळपासून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली, खोकुर्ले दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तसेच भोगावती नदीवरील बालिंगा पुलाजवळ धोका पातळीवरुन पुराचे पाणी वाहात असल्यामुळे खबरदारी म्हणून २३ जुलैपासून या मार्गावरील वाहातूक बंद करण्यात आली होती. आता पावसाने उसंत घेतल्यामुळे मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. त्याचबरोबर बालिंगा ब्रीज येथील पुराच्या पाण्याची धोक्याची पातळी कमी झाल्यामुळे या पुलावरील वाहातुक सुरु करण्यात आले आहे. जर पुन्हा पुरस्थिती निर्माण झाली तरी वाहातूक बंद करावी लागेल नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी प्रसिध्दीपञातुन केले आहे.







