राजापूर प्रतिनिधी :राजापूर तालुक्यातून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला तालुक्यातील गोरक्षकांनी थरारक पाठलाग करत पकडले असून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गो तस्करी होत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. या गो तस्करीला आळा घालण्यासाठी गोरक्षक प – यत्नशील असून अशाच प्रकारे सोलगाव परिसरातून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक गो तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. सोमवारी दुपारी सोलगाव मार्गावरून गुरे वाहतूक करणारा टेम्पो येत असल्याची खबर मिळताच गोरक्षकांनी या गाडीचा पाठलाग करत नेरके येथे सदरची गाडी अडविली. यावेळी टेम्पोमध्ये तीन जनावरे होती. त्यानंतर तत्काळ राजापूर पोलिसांना याबाबतची खबर देण्यात आली.
राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जात टेम्पोसह चालक चंद्रकांत कुर्ले याला ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. राजापुरातील गोरक्षकांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.











