कोयत्याने वार केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीला जामीन मंजूर

कणकवली : करंजे स्मशानभूमी परिसरात बीएसएनएल टॉवरवरील कामादरम्यान दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

 

या घटनेत, टॉवरवरील इलेक्ट्रिक काम करणारा कामगार आणि इतर कामगार यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी अल्फाज फिरोज मुल्ला (रा. वाळवा, जि. सांगली) याने ठेकेदार परवेज खान याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादी शान मोहम्मद हसीन मलीक हा वाद सोडवण्यासाठी पुढे गेला असता, आरोपीने त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ कोयत्याने वार करून दुखापत केली.

 

या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११८(२), १३१, ३५२, ३५१(३) अन्वये २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

अटकेत असलेल्या आरोपी अल्फाज मुल्ला यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटूरिया यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.

 

आरोपीच्या वतीने ॲड. निकिता म्हापणकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. नितीन म्हापणकर व ॲड. तन्वी परब यांनी सहकार्य केले.