पोलीस पाटलांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्यात यावे

गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

लांजा (प्रतिनिधी): पोलीस पाटलांच्या निवृत्तीचे वय हे ६० वरून ६५ वर्षापर्यंत वाढवण्याचा अभिप्राय पाठवाण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज बुधवारी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांना सादर करण्यात आले.
गेली अनेक वर्षापासून पोलीस पाटील यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षापर्यंत वाढवावे ही मागणी प्रलंबित आहे. पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती करता पात्रतेच्या वयाची अट २५ ते ४५ वर्षे अशी आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना यामध्ये संधी मिळते. परंतु ४५ व्या वर्षी पोलीस पाटील झालेला तरुण केवळ पंधरा वर्षानंतर निवृत्त होतो. त्यामुळे पुढील काळात अर्थार्जणांचे कोणतेही साधन उपलब्ध होत नाही. निवृत्तीचे वय ५ वर्षांनी वाढविल्यास त्यांच्या अनुभवाचा उपयोग गावाला व शासनाला होईल. शिवाय त्यांचा आर्थिकदृष्ट्या फायदा पोलीस पाटील यांना होईल. शासनाच्या तिजोरीवर अधिकचा अर्थभार सुद्धा पडणार नाही.
मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्ष आहे. त्यामुळे पोलीस पाटील सुद्धा वयाच्या ६५ वर्षापर्यंत अनुभवाच्या आधारे सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
३१ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर येथे पोलीस पाटील यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने दिनांक ९/३/ २०२६ रोजी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी व गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील , उपाध्यक्ष अरुण बोडके पाटील व पोलीस पाटील प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी अन्य मागण्या समवेत प्राधान्याने या मागणीवर चर्चा होऊन ती मान्य करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हा अधिक्षक यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात येणार असून शासन त्यावर योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चांगला अभिप्राय देण्या कामी निवेदन पत्र देण्यात आले. त्यावर रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी आमच्या कार्यालयाकडून चांगला अभिप्राय शासनाला पाठवण्यात येईल असे सांगितले.
हे निवेदन देताना राज्य खजिनदार विश्वनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र कोटकर, उपाध्यक्ष निलेश ठीक, खजिनदार संतोष सकपाळ, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत थुळ, सहसचिव श्रीराम बेदरकर, जिल्हा महिला संघटक सौ. रोशनी खडपे, जिल्हा महिला प्रतिनिधी शलाका सावंत देसाई, रत्नागिरी ग्रामीण अध्यक्ष अमेय वेल्हाळ, उपाध्यक्ष संतोष नागवेकर, सचिव सौ. प्रिया बंदरकर, खजिनदार संजू सावंत,शहर अध्यक्ष रजनीकांत पंडये, उपाध्यक्ष शादाब मुकादम,सौ. अंकिता सावंत जयगड विभाग सचिव सुधाकर शिर्के, केशव गुण्ये आदी उपस्थित होते.