शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार – सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी येथे कृषी महोत्सवाचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
आंबा व काजू पिकांबरोबरच शेतकरी ऊस भात कलिंगड हळद भाजीपाला इत्यादी पिके घेत आहेत. हे अभिमानास्पद आहे. या शेतकऱ्यांपासून इतरांनी प्रेरणा घेऊन आर्थिक प्रगती साधावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील महिला बचत गटांचे काम ही अत्यंत चांगले आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण करून देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे यांनी कृषी महोत्सव प्रसंगी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन वैभववाडी पंचायत समिती परिसर व सभागृहामध्ये केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, सौ श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, आत्मा समिती अध्यक्ष मंगेश कदम, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, गट विकास अधिकारी प्रिमेष वाघ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सावंत, यांच्यासह शेतकरी बचत गट महिला, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सभापती रावराणे पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना असून या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेतात राबून पैसे कमवावे. फुकटच्या मिळणाऱ्या पैशाची सवय लावून घेऊ नका.

यावेळी प्रमोद रावराणे यांनी या पिकांबरोबरच शेतकऱ्यांनी नाचणी पिकाकडे वळावे. त्यासाठी शासनाने 42 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. तर तालुक्यात असलेल्या धरणांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे असे म्हणाले.

तर फार्मर प्रोडूसर कंपनी व आत्मा समिती अध्यक्ष मंगेश कदम यांनी कंपनीमार्फत शेतकऱ्यांना हळद लागवड हळद काढणी व हळद प्रोसेसिंग करून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील म्हणाले, शासनाने भरड धान्य आहारात समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती केली. असून ही भरडधान्य पोषणमूल्य युक्त असून शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबरच भरड धान्याची लागवड करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या फार्मर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा.

वैभववाडी तालुक्यात विविध प्रकारची फळ पिके भाजीपाला व इतर पिकांमध्ये अग्रेसर आहे. त्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जयेंद्र रावराणे, जि. प. सदस्या रिद्धी सुतार, साची कोलते यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री सावंत यांनी केले. सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक श्री वाघमोडे यांनी मानले.