“तुझ्या कोंबड्या-हंस दुपारी ओरडतात”; कारणावरून खेडमध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा

खेड (प्रतिनिधी) : “तुझ्या कोंबड्या आणि हंस दुपारी ओरडतात, त्यामुळे माझी झोप मोड होते,” या कारणावरून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसे येथे एका वकिलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तिसे येथील अॅड. नवाबखान निझाम अहमद तिसेकर (वय ५५) हे १५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता आपल्या घरी असताना, घराबाहेरून शिवीगाळ आणि आरडाओरड ऐकू आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, असिफअली महमद तिसेकर हा हातात दगड घेऊन उभा होता. त्याने वरील कारण सांगत संतापाच्या भरात प्रथम एक दगड हंसावर फेकला आणि त्यानंतर दुसरा मोठा दगड अॅड. तिसेकर यांच्या दिशेने भिरकावला. हा दगड त्यांच्या डाव्या खांद्याला लागल्याने ते जखमी झाले.

यानंतर आरोपी असिफअली याने जवळच असलेले धान्य दळण्याचे जड दगडी जाते उचलून फिर्यादींवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याचा मोठा भाऊ जहिर अली तिसेकर घटनास्थळी आला आणि त्यानेही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर अॅड. तिसेकर यांनी १९ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), १३१ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.