शहरातील दवाखाना व बंद घर फोडले : मोटरसायकल केली लंपास
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी शहरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एक बंद घर व खाजगी दवाखाना फोडला. चोरट्यांच्या हाती काहीच दोन्ही ठिकाणी काही लागले नाही. मात्र चोरट्याने एका हॉटेल व्यावसायिकाची मोटरसायकल लांबवली. चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत.
शहरातील एका खाजगी दवाखान्याचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दवाखान्यातील साहित्य विस्कटून टाकले. परंतु कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीस गेली नाही. डॉक्टर सकाळी दवाखान्यात आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरी झाली नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
याच दरम्यान शहरातील आणखी एका बंद घरालाही चोरट्याने लक्ष्य केले. मात्र त्या ठिकाणीही काहीच हाती न लागल्याने चोरट्याचा डाव फसला.
दरम्यान, शहरातील हॉटेल व्यावसायिक भूषण पडवळ यांनी आपली मोटरसायकल रात्री बंगल्यासमोर लावली होती. सकाळी उठल्यानंतर मोटरसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही. याच परिसरातील आणखी एका व्यक्तीची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोल संपल्यामुळे काही अंतरावरच ती दुचाकी रस्त्यावर सोडून चोरट्याने पलायन केले.
या संपूर्ण प्रकारामुळे वैभववाडी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत अद्याप वैभववाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.












