पोलिसांच्या उशिरा येण्याने संताप..
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापुर : हातकणंगले तालुक्यातील अंबप फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात अंबप येथील ३८ वर्षीय सर्जेराव महादेव डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून त्याची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर सर्जेराव डोंगरे महाप्रसाद घेऊन पायी आपल्या अंबप गावाकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या (एम एच ११बी.यु ५३७२) या दुचाकीने जोराची धडक दिली.
या धडकेत डोंगरे रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान अपघाताची माहिती मिळूनही पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे परिसरात संतप्त व्यक्त होत आहे.
याप्रकरणी किर्लोस्करवाडी येथील मोटरसायकलस्वार अब्दुल रहमान पठाण याच्याविरुद्ध पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेठवडगाव पोलीस करत आहेत.












