नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकांवर गुन्हा

 

कुत्र्यांना वाचवताना कार उलटली; चालकाचा मृत्यू
दुचाकी अपघातातही एकाचा जागीच मृत्यू

नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका अपघातात कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून चालकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत दुचाकीला धडक बसल्याने एका व्यक्तीचा जीव गेला. दोन्ही घटनांमध्ये गंभीर दुखापती आणि अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी निष्काळजी वाहनचालकांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.


नाशिक : शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर 15 मार्च रोजी घडलेल्या अपघातात कार चालक दिगंबर बोडके (41) यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसात त्यांच्या भावाने राजेश बोडके यांनी फिर्याद दिली आहे.

दिगंबर बोडके सायखेडा येथून घरी परतत असताना अचानक रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीची दिशा बदलताना कार उलटली आणि त्यांना डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. तसेच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी BNS कलम 106 (1) अंतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यू असा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, दुसऱ्या अपघातात दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील रहिवासी साहेबराव ढिकले यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना म्हसरूळ परिसरात घडली.

फिर्यादीनुसार, साहेबराव ढिकले हे त्यांचा मुलगा योगेश ढिकले आणि मित्रासह दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत ते वाहनावरून खाली फेकले गेले.

अपघातात साहेबराव यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या मित्रालाही इजा झाली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र साहेबराव ढिकले यांना मृत घोषित करण्यात आले.