दोन वनपाल सुरेश उपारे आणि रामदास खोत यांनाही सुवर्णपदक तर एका वनरक्षकास रजत पदक
रत्नागिरी:
रत्नागिरीमध्ये प्रथमच पक्षी संमेलन घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचा पक्षी निश्चित करून रत्नागिरीला नवी ओळख मिळवून देण्यात ज्यांचा महत्वाचा सहभाग आहे त्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांना वनसेवेतील शासनाने उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदक घोषित केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वनसेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पदके जाहीर केली आहेत. या गौरवशाली यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील (कोल्हापूर वनवृत्त) अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून, विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांच्यासह दोन वनपालांना सुवर्ण पदक, तर एका वनरक्षकाला रजत पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पदक विजेते मानकरी:शासनाने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार, रत्नागिरीतील खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदकांसाठी निवड झाली आहे. श्रीमती गिरिजा शोभा नरेंद्र देसाई (विभागीय वन अधिकारी): वन व्यवस्थापन क्षेत्रातील सन २०२३-२४ मधील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सुवर्ण पदक जाहीर झाले आहे.
श्री. सुरेश आत्माराम उपरे (वनपाल): वन व वन्यजीव संरक्षण कार्यातील प्रभावी कामगिरीबद्दल त्यांना सन २०२३-२४ चे सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. रामदास दत्तात्रय खोत (वनपाल): सन २०२४-२५ या वर्षातील वन व वन्यजीव संरक्षण कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना सुवर्ण पदक बहाल करण्यात आले आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्य स्तरावरून ही पदके दिली जातात. या निवडीसाठी अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल, सचोटी, तांत्रिक कार्यक्षमता आणि त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान या बाबींचा विचार करून ही निवड केली आहे.राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या गौरव यादीत रत्नागिरीतील वनविभागाच्या चोख कामगिरीची दखल घेतल्याने जिल्ह्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.










