राजापूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजापूरातील प्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड. यशवंत कावतकर यांची निवड

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजापूरातील प्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड. यशवंत कावतकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल अ‍ॅड. यशवंत कावतकर यांचे अभिनंदन होत आहे.
राजापूर तालुका बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बार असोसिएशनच्या बैठकीत ही नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी अ‍ॅड. यशवंत कावतकर यांची तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. पराग मोदी, सचिवपदी अ‍ॅड. सुशांत पवार, सहसचिवपदी अ‍ॅड. प्रविण नागरेकर, खजिनदारपदी अ‍ॅड. अविनाश कुवेसकर, महिला प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. रोझीना खोपेकर, अ‍ॅड. तेजस्विनी राणे यांचीही निवड झाली आहे.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांसह कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. तर नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. कावतकर यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातुन वकील वर्गाचे प्रश्‍न सोडविताना भविष्यात तज्ञ व जेष्ठ वकीलांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत तालुक्यातील वकीलांना न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. तर कायद्यांमध्ये झालेल्या नवीन तरतुदींची वकीलांना सखोल माहिती मिळावी या उद्देशाने कायदे तज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील हर्डी-कोदवली गावचे सुपूत्र असलेले अ‍ॅड. कावतकर हे गेल्या २४ वर्षापासून वकीली क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या वकिलीच्या माध्यमातुन त्यांनी राजापूर तालुक्यासह जिल्हयातील अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. आपल्या अभ्यासून वृत्तीमुळे त्यांनी या वकील व्यवसायामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सामाजिक कार्याची आवड असलेले अ‍ॅड. कावतकर हे विविध सामाजिक संस्थांवर देखील कार्यरत आहेत. यातुन त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. तर असोसिएशनच्या सहसचिवपदी निवड झालेले अ‍ॅड. प्रविण नागरेकर हे शीळ गावचे सुपूत्र असून मावळते अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार यांचे ते शिष्य आहेत. तर कार्यकारणीत निवड झालेले सर्वच तरूण वकिल हे गेली कित्येक वर्ष राजापुरात वकिली व्यवसाय करत असुन त्यांनी देखील आपल्या कार्याचा चांगलाच ठसा या क्षेत्रात उमटवलेला आहे. राजापूर तालुका बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. कावतकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.