टोल नाक्यावर तालुका वासीयांना टोल माफी देण्याची मागणी
अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले निवेदन
राजापूर (प्रतिनिधी): मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा वेगाने सुरू झाल्या आहेत. दरम्यात टोल सुरू करायचा असेल तर अगोदर राजापूर तालुक्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी अशी मागणी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे. तसे केले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत याबाबतचे एक लेखी निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हातिवले टोल नाक्यावर देण्यात आले.
महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची शासनामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कोकणवासीयांच्या माथी निकृष्ट दर्जाचा रस्ता मारून आता त्यांच्याकडून टोल वसुली करून पिळवणूक करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत उपस्थितांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यापूर्वीही हातिवले येथील हा टोल नाका दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या आंदोलनामुळे व आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने टोल वसुली बंद करण्यात आली होती.
दरम्यान पुन्हा टोल सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येत सुरुवातीला निवेदन देऊन आणि गरज पडल्यास आंदोलनाच्या माध्यमातून टोलविरोधात लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
मुंबई–गोवा महामार्गावरील अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. राजापूर एस.टी. डेपो समोरील महामार्गाचे काम अपूर्ण असून येथे वारंवार अपघात होत आहेत. भू-संपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे मार्ग बंद झाले असून त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. सर्विस रोड, बस स्टॉप, पिकअप शेड यांसारखी कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत वृक्ष लागवड झालेली नाही. मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. तसेच महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
हातिवले टोल मार्गावरून राजापूर शहरात नागरिकांना दैनंदिन कामासाठी वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बँका, पोस्ट तसेच बाजारपेठेतील दैनंदिन खरेदीसाठी नागरिकांना दिवसातून अनेक वेळा या मार्गाचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत स्थानिकांना टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोल माफी देण्यात यावी, अन्यथा सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदानाद्वारे देण्यात आला आहे. महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. कुमावत यांनी हे निवेदन स्विकारले.
याप्रसंगी सर्वच राजकिय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहन चालक, व्यापारी, शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो 26 आरजेपी 1
राजापूर तालुक्यातील जनतेला हातिवले टोल नाक्यावर टोलमाफी द्यावी या मागणीचे निवेदन महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. कुमावत यांना देताना राजापूरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, वाहन चालक व ग्रामस्थ.











