काळसेतील भातपीक लागवड क्षेत्राची उपकृषि अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रगत शेतकरी समूह गटाचा समूह शेतीचा उत्तम नमुना
चौके -प्रतिनिधी :- काळसे गावातील नव्याने स्थापन झालेल्या प्रगत शेतकरी समूह गटाने लागवड केलेल्या उन्हाळी भातपीक
क्षेत्राची गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी मालवण तालुका कृषि अधिकारी कार्यालयचे उप कृषि अधिकारी धनंजय गावडे तसेच सहाय्यक कृषि अधिकारी विद्या कुबल यांनी पाहणी केली. व प्रगत शेतकरी समूह गटातील सर्व शेतकऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण माजी सभापती राजेंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य पप्या राऊळ प्रगत शेतकरी समुह गटाचे अध्यक्ष मनोज मालवणकर, उपाध्यक्ष संजय गोसावी, सचिव श्याम मालवणकर, सहसचिव अमित मालवणकर, खजिनदार सतीश जुवेकर, सदस्य मंदार मयेकर, सुनिल मालवणकर, अजिंक्य मालवणकर, सुधीर नाईक, लीलाधर नाईक, ज्ञानेश्वर सातार्डेकर, दिनेश ठाकूर, संतोष परब, शाहू वरक, नारायण मयेकर, मंगेश पात्रे, उमेश खानविलकर, आदी शेतकरी उपस्थित होते.
काळसे – धामापूर गाव पाण्याने समृद्ध गाव म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा, माकड, गवेरेडे यांच्याकडून होणारी पिकांची नासधूस, शेती कामासाठी गडी माणसांचा भासणारा तुटवडा यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच सोडून देण्याचा पर्याय निवडला पर्यायाने सुपीक असूनही पडीक जमिनी वाढू लागल्या आणि लागवड क्षेत्र कमी होऊ लागले. परंतु आपल्या कृषिप्रधान देशात शेतीशिवाय पर्याय नाही हे काळसे गावातील काही शेतकऱ्यांना लक्षात आले आणि त्यांनी पडीक जमिनी कसण्याचा निर्धार केला. एकट्याने शेती करणे अडचणीचे असल्यामुळे गावातील 17 शेतकऱ्यांनी एकत्र येत विषमुक्त समुह शेती करण्याचा पर्याय निवडला आणि यात त्यांना यशही प्राप्त झाले.
मनोज मालवणकर, श्याम मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सप्टेंबर 2025 मध्ये प्रगत शेतकरी समुह गटाची स्थापना केली. सुरुवातीला लाल माठ, मुळा या पालेभाजी पिकाची लागवड करून समुह शेतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये साडेतीन एकर क्षेत्रात पारंपारिक कमी कॅलरिज, जीनचे प्रमाण जास्त असणारे व कोरोना सारख्या रोगावर उपयुक्त ठरणारे सोरटी आणि लोहाचे सर्वाधिक प्रमाण असलेले हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयुक्त आणि मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त अशा रक्तसाळ या भात बियाण्यांची लागवड करून वायंगणी शेती यशस्वी केली याच भात लागवड क्षेत्राला उप कृषि अधिकारी धनंजय गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी पानी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धेतही प्रगत शेतकरी समुह गटाने आपला सहभाग नोंदवला आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली फार्मर कप मालावण तालुक्यात आणायचाच असा निर्धार यावेळी श्याम मालवणकर यांनी व्यक्त केला.
काळसे येथे भातपीक लागवड क्षेत्राची क्षेत्रभेट कार्यक्रमा अंतर्गत पाहणीप्रसंगी उपस्थित उपकृषि अधिकारी धनंजय गावडे, सोबत सहाय्यक कृषि अधिकारी विद्या कुबल, श्याम मालवणकर, आणि प्रगत शेतकरी गटाचे सदस्य शेतकरी.












