काजू बागेत चोरी; १.१२ लाखांचा मुद्देमाल लंपास

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट-खैराटवाडी परिसरात काजू बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजय शंकर मुळेकर (वय ५८, रा. फोंडाघाट, पिंपळवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

फिर्यादीनुसार, मुळेकर यांच्या मालकीच्या सर्वे नं. १४१, हिस्सा नं. ६ या खैराटवाडी येथील काजू बागेत चिरेबंदी शेतमांगर असून त्यामध्ये सुकविलेल्या काजू बियांचे पोते साठवून ठेवण्यात आले होते. २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेपासून ते २६ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतमांगराच्या खिडकीला बसवलेली लोखंडी ग्रिल तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सुमारे ५० किलो वजनाची एकूण १६ पोती (अंदाजे ७०० किलो) सुक्या काजू बियांची ज्यांची किंमत सुमारे १,१२,००० रुपये आहे, तसेच स्वयंपाकघरातील भारत गॅस कंपनीचा सिलेंडर (किंमत ८०० रुपये) असा एकूण १,१२,८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

 

घटनेनंतर मुळेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली असता चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.