आबलोली(वार्ताहर):
बौद्धजन सहकारी संघ ,तालुका गुहागर शाखा क्रमांक ५५, चिंद्रवळे या संघटनेच्या अंतर्गत रमाई महिला मंडळ,चिंद्रवळे या महिला मंडळाच्या माजी सचिव , माजी अध्यक्षा आणि जेष्ठ सल्लागार , मार्गदर्शक तसेच चिंद्रवळे गावच्या लोकप्रिय ज्येष्ठ नागरिक , समाजसेविका, उपासिका शैलजा हरिश्चंद्र सुर्वे यांचे दिनांक २४|३|२०२६ रोजी राहत्या घरी वृद्धापकाळात दुःखद निधन झाले.
ज्या काळात विशेषत: ग्रामीण भागात स्त्रीया चुल व मुल सांभाळत होत्या. त्या काळात अनेक संकटावर मात करून प्रापंचिक जबाबदारीतून वाट काढीत त्यांचे पती जाणते सामाजिक कार्यकर्ते , निवृत्त मुख्याध्यापक आणि लोकप्रिय भूगर्भजल संशोधक स्मृतीशेष हरिश्चंद्र सुर्वे गुरुजींनी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. पुढे त्या सलपेवाडी(चिंद्रवळे) येथील बालवाडी मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. गावातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून सलपेवाडीने त्यांना सावित्रीबाई फुले या नावानी सन्मानित केले. आजही त्यांना गावच्या सावित्रीबाई फुले म्हणून संबोधले जाते. त्यांनी मुलांना दिलेले संस्कार आणि प्रेम आजच्या स्थानिक युवावर्गाला दिशादर्शक ठरले आहे .इतकेच नव्हे, तर गावासाठी, शाळेसाठी, शिक्षणासाठी आणि सार्वजनिक सेवेसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेले योगदान बहुचर्चित आहे. सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना नाटकाची, विविधांगी खेळ, स्पर्धांची विशेषतः गायन कलेची आवड होती. सामाजिक बांधिलकी जोपासताना निवृत्ती पेन्शन मधून गरजूना,ग्रामीण उपक्रमांना मदत आणि स्थानिक बुद्ध विहाराला देणगी स्वरूपात हातभार दिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य पुढे प्रवाहीत राहावे यासाठी त्या कार्यरत होत्या. गेली पंधरा वर्ष त्या बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर, शाखा क्रमांक ५५ , चिंद्रवळे या संघटनेच्या अंतर्गत माता रमाई महिला मंडळाच्या माजी सचिव, माजी अध्यक्षा आणि सल्लागार, मार्गदर्शक होत्या.
स्मृतीशेष शैलजा हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, जावई,सुना व उच्चशिक्षित नातवंडे असा परिवार आहे. यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे(बौद्धवाडी) येथे दिनांक ५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.












