राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच लवकरच राजापूर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा आणि तालुक्यातील प्रलंबित मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला.
राजापूर ग्रामिण रुग्णालयातील रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सभापती सौ. नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप,शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, , ग्रामिण रुग्णालय राजापूर वैद्यकीय अधिकारी डॉ.राम मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ.सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्हयात सध्या मेडीकल कॉलेज सुरू असून भविष्यात डेंटीस्ट, आयुष, होमिओपॅथीक कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासणार नाही.
राजापूर तालुक्यातील जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरूस्ती, कर्मचारी निवासस्थानांची दुरूस्ती, अशी कामे प्राधान्याने करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या ७ तारीखला मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली असून त्यावेळी या मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ.सामंत यांनी सांगितले. तसेच या बैठकीत राजापूर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा आणि वाटूळ येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रश्न मार्गी लावण्याचाही प्रयत्न केला जाईल असे सांगितले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलसाठी जागा उपलब्ध असून आता निधी करीता आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती श्री. गुरव यांनी १०८ रुग्णवाहीकेतून केवळ रत्नागिरी येथे रुग्ण घेवून जाण्यास परवानी आहे. मात्र काही वेळा रूग्णाला कोल्हापूर येथे हलवावे लागते, अशावेळी रूग्णवाहीका मिळत नसल्याने रूग्णाच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे कोल्हापूर येथे रूग्ण नेण्यासाठी देखील १०८ रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तर राजापूर तालुक्यात विकासाच्या बाबतीत निर्माण झालेली दरी भरून काढण्याचे आ. सामंत करत असून आ.सामंत यांच्यामुळे राज्यात सर्वात जास्त निधी राजापूर मतदार संघाला मिळाल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी जिल्हयातील शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










