दाभोली मठात श्री गुरु महापुण्यतिथी वार्षिकोत्सवाला प्रारंभ….

श्रीमत् स्वामी पूर्णानंद भक्तनिवासाचे उद्या होणार लोर्कापण

वेंगुर्ले : प्रतिनिधी
दाभोलीतील श्री मठ संस्थान येथे श्री गुरु महापुण्यतिथी वार्षिकोत्सव आज शनिवार पासून सुरू झाला. तर उद्या रविवार ५ एप्रिल रोजी अनेक दिवसांचे स्वप्न असलेल्या श्रीमत् स्वामी पूर्णानंद भक्तनिवासाचे लोर्कापण करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री मठ संस्थान दाभोली विश्वस्थ मंडळाचे खजिनदार प्रशांत प्रभूखानोलकर व विश्वस्त सचिन वालावलकर यांनी दिली.

दाभोलीतील श्री मठ संस्थानला ३०० वर्षांचा इतिहास आहे. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाचे हे संपूर्ण भारतातील एकमेव पीठ आहे. मठाचे पहिले पीठाधिश श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज यांच्यावर येथील जनतेची व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीबांचवाची अढळ श्रद्धा आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच स्वामी महाराजांची समाधीस्थळे मठात स्थापीत असून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही मठातर्फे लोकसेवेचे कार्य चालू आहे. अतिशय प्राचिन इतिहास असलेल्या दाभोलीतील कुडाळदेशकर ज्ञाती बांधवांच्या श्री मठ संस्थानचे देशभरात मोठे महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन अनेकांना संकटमुक्त करण्याचे काम या धार्मिन पीठाने केले आहे. या मठाचे पहिले पिठाधिश श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज यांच्यावर येथील जनतेची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे हा मठ कुडाळदेशकर ज्ञाती बांधवांचा असला तरी वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील सर्वच जातीधर्मातील लोकांचे या मठाशी ऋणानुबंध जुळले आहेत. देश-विदेशातील कुडाळदेशकर ज्ञाती बांधव या मठाला भेट देऊन स्वामींचा शुमाशिर्वाद घेतात, असे सचिन वालावलकर म्हणाले.

या मठात नित्यनियमाने धार्मिक कार्यक्रम होतात. वर्षभरातील महत्त्वाचे उत्सवही साजरे केले जातात. मठामध्ये श्री देव नारायणाचे मंदिर व समागृह १९८९ मध्ये बांधण्यात आले आहे. मठात स्वामी निवास कुटिका, मक्तनिवास, सभागृह व अन्य अत्याश्यक सुविधा आहेत. मठाचे भक्तनिवास जीर्ण झाले असल्याने नव्याने आधुनिक सोयींनी युक्त असे भक्तनिवास बांधण्याचा संकल्प मठ संस्थानतर्फे करण्यात आला होता. याला कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील दानशूर व्यक्तींनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. त्यानुसार नव्या मक्त निवासात प्रशस्त अशा १४ खोल्या व टेरेसवर प्रशस्त असे सभागृह बांधण्याचे काम अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. या भक्त निवासाचे लोकार्पण मठाच्या श्री गुरु महापुण्यतिथी वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून रविवार ५ एप्रिल रोजी करण्यात येत आहे, असेही श्री.वालावलकर म्हणाले.

रविवार ५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता मंगलधून, सकाळी ६ ते १० या वेळेत श्री देव नारायण पूजा, श्रीमत् पूर्णानंद स्वामी समाधी व सर्व समाधींची पूजा, मंगलचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, नवग्रहपीठ आवाहन व पूजन, पवमानसुक्त हवन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहूती, ११ वाजता सोळा ब्राह्मण पूजन व समराधना, त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व नंतर महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ह. भ. प. मोडक बुवा रायकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना बाळकृष्ण नाईक, सिद्धेश कुंटे व गौरव पिंगुळकर संगीतसाथ करणार आहेत. सायं. ७ ते ९ या वेळेत धुपारत, आरती, रात्री ९ वाजता भोजन, १० ते ११ या वेळेत पुराणवाचन व श्रीची पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत कीर्तन, मजन, नामस्मरण, पहाटे ४ ते ६ या वेळेत कोचरा येथील रत्नाकर प्रभूकोचरेकर यांचा लळीत कार्यक्रम व प्रार्थनेने या उत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती खजिनदार प्रशांत प्रभूखानोलकर यांनी दिली.