वेंगुर्ले : प्रतिनिधी
हनुमान जयंती निमित्त नृसिंह संगीत साधना संगीत विद्यालय, ओरोस खुर्द परिवारातर्फे श्री हनुमान मंदिर, ओरोस खुर्द येथे आयोजित जिल्ह्यातील पहिली जिल्हास्तरीय पखवाज सोलो वादन स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातून एकूण १३ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा २ फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण पुणे येथील प्रसिद्ध पखवाज वादक श्री. कृष्णा साळुंखे यांचे शिष्य श्री. ज्ञानेश्वर अंडील व श्री. यश मेस्त्री यांनी केले.
या स्पर्धेमध्ये तालविश्व संगीत विद्यालय, तुळस – होडावडा, ता. वेंगुर्ला, संचालक श्री. मनीष तांबोसकर यांचे विद्यार्थी श्री. बाळकृष्ण परब, श्री. अथर्व गुळेकर आणि श्री. आकाश साळगावकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
तर लेहरा साथ करणारे श्री. हर्षल मेस्त्री, अणसुर यांना उत्कृष्ट लेहरा वादक आणि श्री. बाळकृष्ण परब उत्कृष्ट बजंती (वादक) अशी पारितोषिके प्राप्त झाली आहेत. या अभूतपूर्व यशामुळे तुळस गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होतं आहे. श्री चिंतामणी संगीत विद्यालय, वेंगुर्ला संचालक श्री. निलेश पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












