सिंधुदुर्ग कांदळवन विभाग ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात अग्रेसर 

पिल्लांसाठी ठरतोय ‘पालक’

सावंतवाडी । प्रतिनिधी : समुद्री कासवांमध्ये नैसर्गिकरित्या पालकत्वाची भावना नसते, मात्र सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर ही जबाबदारी आता कांदळवन विभागाने अतिशय मायेने स्वीकारली आहे. जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी कांदळवन विभाग ‘पालकाच्या’ भूमिकेत वावरत असून, हजारो पिल्लांना सुरक्षितपणे जीवनदान देण्यात येत आहे.

साधारणतः नोव्हेंबर ते मे या विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले मादी सुरक्षित किनाऱ्यावर दीड ते दोन फूट खड्डा करून ८० ते १२० अंडी घालते आणि पुन्हा समुद्रात निघून जाते. या अंड्यांची काळजी घेण्यासाठी मादी तिथे थांबत नाही. ४५ ते ५५ दिवसांनी अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना भटके कुत्रे, मुंगूस, घोरपड, साप आणि ब्राह्मणी घार यांसारख्या शत्रूंचा मोठा धोका असतो. यापूर्वी काही लोक अंड्यांची चोरीही करत असत. या सर्व संकटांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग वनविभाग आणि कांदळवन विभाग गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेत आहे.

*कासव मित्रांचे मोलाचे योगदान*

कांदळवन विभाग दक्षिण कोकण, मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली मानधन तत्त्वावर स्थानिक ‘कासव मित्रांची’ नेमणूक केली जाते. या मित्रांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करून त्यांना अंडी व्यवस्थापन आणि उबवणी केंद्राच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. भरती रेषेपासून दूर सुरक्षित ठिकाणी उबवणी केंद्रे उभारली जातात. वायंगणी येथील सुहास तोरसकर यांसारखे कासव मित्र रात्रीची गस्त घालून अंडी गोळा करतात आणि ती सुरक्षितपणे केंद्रात आणून ठेवतात. तेथील तापमानावर नियंत्रण ठेवून पिल्ले बाहेर येईपर्यंत त्यांची निगा राखली जाते.

*सॅटेलाईट ट्रॅकिंगद्वारे संशोधनात भर*

कासव संवर्धनासोबतच त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. २०२२ मध्ये प्रथमा, सावनी, वनश्री, लक्ष्मी, रेवा, गुहा आणि बागेश्री या सात मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले होते. त्यातील ‘बागेश्री’ या कासवाने ३५०० किमीचा प्रवास करत श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओडिसा गाठले होते. तसेच, २० नोव्हेंबर २०२५ रोजी डहाणू येथून सोडलेली ‘धवललक्ष्मी’ ही मादी ओमान समुद्रापर्यंत प्रवास करून आली आहे. २०२५ मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील ६४ माद्यांना मेटल टॅगही लावण्यात आले आहेत.

*उद्या वायंगणी बीचवर ‘कासव महोत्सव’*

कासव संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या, शुक्रवार १० एप्रिल रोजी वेंगुर्ले येथील वायंगणी बीच येथे ‘कासव महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना या मोहिमेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

मालवण कांदळवन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे, वेंगुर्ला परिमंडळ वन अधिकारी सुनील प्रकाश सावंत आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे वायंगणी, उभादांडा, शिरोडा-वेळागर या किनाऱ्यांवर कासव संवर्धनाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असल्याची माहिती श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश मर्गज दिली आहे.