निरोगी आयुष्य हीच खरी स्वस्थ जीवनाची गुरुकिल्ली – डॉ रश्मी सावंत

मजरेकौंढर नवरतवाडी येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद
कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूणचा उपक्रम

चिपळूण (वार्ताहर) : माणसाच्या मन आणि तन या दोन गोष्टी जर निरोगी असतील तर अशा व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते. यासाठी जीवन जगताना काही मूल्य पाळणे महत्वाचे आहे. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करून आहार, व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. तरच स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगता येते असा सल्ला श्री हॉस्पिटल चिपळूणच्या डॉ रश्मी अभिजीत सावंत यांनी दिला.

कुणबी समाजोन्नती मुंबई शाखा ग्रामीण चिपळूण व श्री हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने मजरे कौंढर येथे मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रथम आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थिती होते. त्यानंतर सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. रश्मी सावंत म्हणाल्या की, श्री हॉस्पिटल चिपळूण येथे रुग्णांसाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. शासनाच्या आरोग्य संदर्भातील योजनाही सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून श्री हॉस्पिटल नेहमीच अग्रेसर आहे. कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण आणि येथील ग्रामस्थ यांनी देवीच्या जत्रेनिमित आरोग्य बाबीला महत्व दिले याबाबत त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

या आरोग्य शिबिरात सुमारे 80 रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये शिबिरामध्ये श्री हॉस्पिटल तर्फे बीपी व शुगर तपासणी, महिलांचे आजार, ईसीजी तपासणी व जनरल तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषधे देण्यात आली. या व्यतिरिक्त दातांची तपासणी डॉ सतीश गवाळे आणि सौ प्रीतम कारंडे यांनी केली. डोळ्यांची तपासणी संजय घेवडे आणि त्यांचे सहकारी सुरज भोसले यांनी केली. जास्त रुग्णांना डोळ्यांचा त्रास असल्याचे शिबिरता दिसून आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष ॲड संतोष कुळे, सचिव हर्षल कुळे, उपाध्यक्ष संतोष मालप, महेश कातकर, भरत धुलप, नितेश खाडे, मजरे कौंढर नवरतवाडी स्थानिक अध्यक्ष विजय नवरत, पुणे मंडळ अध्यक्ष सुनील नवरत, मुंबई मंडळ अध्यक्ष दत्ताराम नवरत, रामपूर पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, सदस्या सौ सुप्रिया वंजारे, सरपंच भूषण खेडेकर, मजरेकौंढर ग्रामस्थ, पुणे मंडळ व मुंबई मंडळ उपस्थित होते