नाधवडेत सिंधूनायक क्रिकेट स्पर्धा संपन्न
नारायण राणे यांचा 75 वाढदिवस 75 किलोचा केक कापून साजरा
तीन दिव्यांग व्यक्तींना दुचाकी गाड्या भेट तर 75 दिव्यांगाना रोख बक्षीस
स्पर्धेला खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी: ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे असंख्य खेळाडू आहेत. या खेळाडूंनी सातत्याच्या जोरावर देश पातळीवर चमकदार कामगिरी केली पाहिजे. या सर्व खेळाडूंच्या पाठीशी आम्ही लोकप्रतिनिधी आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार व सर्व सोयीनियुक्त क्रीडा विद्यापीठ उभारणार असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.
कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित नाधवडे येथील महादेव मैदानावर सिंधू नायक भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सिंधूनायक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी नारायण राणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 75 किलोचा केक कापून साजरा करण्यात आला. तसेच कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील तीन दिव्यांग व्यक्तींना दुचाकी गाड्या भेट देण्यात आल्या. तसेच 75 दिव्यांग बांधवांना रोख बक्षीस देऊळ सन्मान करण्यात आला.
नारायण राणे म्हणाले, क्रिकेटचा आनंद आपण सर्वांनी जरूर घ्या. परंतु प्रत्येकाने व्यवसाय, काम केले पाहिजे. क्रीडा स्पर्धेतूनच चांगलेच क्रिकेटर निर्माण होतील. देशाच्या टीम मध्ये आपले खेळाडू दिसले पाहिजे. अशा पद्धतीने वाटचाल करा असे सांगितले.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले, जिल्ह्यासाठी स्पोर्ट युनिव्हर्सिटी ची नितांत गरज आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ही सुविधा मंजूर व्हावी. खासदार नारायण राणे यांनी यामध्ये विशेष लक्ष घालावे असे सांगितले. खासदार नारायण राणे, नीलम राणे व नितेश राणे यांचा भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 5 लाख 75 हजार 575 होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व गोवा राज्यातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाधवडे येथील महादेव मैदान क्रीडा रसिकांनी फुलून गेले होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी महापौर चंदू रावराणे, बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, सुरेश सावंत, जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, नासिर काझी, दिलीप तळेकर, प्रभानंद रावराणे, उपसभापती साची कोलते, विजय तावडे, प्राची तावडे, शारदा कांबळे, साधना नकाशे, बंडया मांजरेकर, संदीप साटम व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार व मयेकर मॅडम यांनी केले.












