न्हावेलीतील पार्सेकरवाडी-कुंभारभाट परिसरातील ‘ते’ धोकादायक वीज खांब तातडीने बदला

 

उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची महावितरणकडे मागणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट या परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ वीज खांब अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असून ते पावसाळ्यापूर्वी तातडीने बदलण्यात यावेत, अशी आग्रही मागणी न्हावेलीचे उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यांनी महावितरणकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी उपअभियंता यांना सविस्तर निवेदन दिले असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

​संबंधित परिसरात असलेले हे वीज खांब सध्या शेतजमिनीत उभे आहेत. अनेक वर्षांपासून हे खांब उभे असल्याने ते पूर्णतः गंजले असून पावसाळ्यातील वादळवाऱ्यात ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हे खांब पडल्यास परिसरातील नागरिक आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात याच मार्गावरील एक खांब कोसळल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा तब्बल तीन दिवस खंडित झाला होता. त्या घटनेमुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले होते, याची आठवणही पार्सेकर यांनी निवेदनात करून दिली आहे.

​यंदाचा पावसाळा सुरू होण्यास काहीच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने या जीर्ण खांबांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी नवीन खांब बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच विद्युत वाहिनीला स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून वीज लाईन मोकळी करावी, जेणेकरून पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या निवेदनाची महावितरणच्या वतीने दखल घेण्यात आली आहे. उपअभियंता राक्षे यांनी या तक्रारीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून आवश्यक ते खांब बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. हे निवेदन देताना उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासोबत ओम पार्सेकर, सीताराम परब यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. महावितरण आता यावर किती वेगाने कार्यवाही करते, याकडे न्हावेलीवासीयांचे लक्ष लागले आहे.