सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात झालेल्या चोरीच्या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेतले आहे. राजपूत संतराम पाल (वय ५२, राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व, मूळ राहणार तौकलपूर नगर, ता. सहगंज, उत्तर प्रदेश) आणि राहुल उर्फ दिवानसिंग ओमप्रकाश तोमर (वय ३६, राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व, मूळ राहणार गोकुळ गाव, ता. महावल, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील व त्यांच्या पथकाने या दोन्ही आरोपींना कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. तसेच या आरोपींचा इतर ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.












