ऑपरेशन क्लीन सी अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई
देवगड / प्रतिनिधी
मत्स्य व्यवसाय विभागाने सोमवारी मध्यरात्री उशिरा विजयदुर्गसमोरील समुद्रात एलईडी पद्धतीने अवैध मासेमारी करणारी देवगडच्या अमीना (आयएनडी- एमएच- ५-एमएम-६४७) या नौकेवर कारवाई केली. ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाईसाठी ही नौका मत्स्य विभागाने जप्त करून विजयदुर्ग बंदरात आणली आहे.
सोमवारी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास विजयदुर्गसमोरील समुद्रात किनाऱ्यापासून साधारणतः २० वाव (फॅदम) खोल पाण्यात अमीना ही नौका एलईडी लाईट्सचा वापर करून मासेमारी करताना मत्स्य विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आली. मत्स्य विभागाचे देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी देवगड सुरक्षारक्षक बांदकर, खवळे, टुकरुल, फाटक, नेसवणकर आणि सावजी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या नौकेचे मालक व चालक देवगड येथील असल्याचे समजते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. समुद्रातील अवैध एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग सज्ज असल्याचे परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सांगितले. या यशस्वी कारवाईमुळे देवगड, विजयदुर्ग, मालवणसह संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायात समाधानाचे वातावरण आहे.












